Asia Cup 2025: क्रिकेटच्या आशियाई थराराला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यावेळच्या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार असून, १४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की आशिया कपच्या इतिहासात कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा विजयाचा झेंडा फडकावला आहे? चला तर मग पाहुया आशिया कपचा 'सुलतान' कोण आहे.
क्रिकेट विश्वातील सर्वात रोमांचक स्पर्धांपैकी एक असलेल्या आशिया कपचे बिगुल वाजले आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत आशियातील ८ बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेची घोषणा झाल्यापासूनच क्रिकेट चाहत्यांमध्ये, विशेषतः भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
टीम इंडिया आहे 'आशियाचा किंग'
जेव्हा जेव्हा आशिया कपच्या इतिहासाची पाने उलटली जातात, तेव्हा टीम इंडियाचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेले दिसते. भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक, म्हणजेच ८ वेळा आशिया कपवर आपले नाव कोरले आहे. भारताने १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३ मध्ये ही स्पर्धा जिंकून आपली बादशाहत सिद्ध केली आहे. प्रत्येक वेळी भारतीय संघाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
श्रीलंका दुसऱ्या स्थानी, पाकिस्तानचा क्रमांक कितवा?
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंका. श्रीलंकेच्या संघाने ६ वेळा (१९८६, १९९७, २००४, २००८, २०१४, २०२२) आशिया कपची ट्रॉफी उचलली आहे. श्रीलंका नेहमीच एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जातो. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या नावे फक्त २ वेळा (२०००, २०१२) आशिया कप विजेतेपद आहे. त्यामुळे यावेळेस आपल्या ट्रॉफीची संख्या वाढवण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न असेल.
बुमराह नाही तर हा भारतीय खेळाडू आहे खरा गेमचेंजर इंग्लंड च्या खेळाडूच्या मताने उडाली खळबळ!
९ सप्टेंबरपासून सुरू होणार थरार
आशिया कप २०२५ चा थरार ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) पाच पूर्ण सदस्य - भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान - हे आधीच पात्र ठरले आहेत. त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिराती (UAE), ओमान आणि हॉंगकॉंग हे संघही सहभागी होणार आहेत, ज्यामुळे ही स्पर्धा अधिकच चुरशीची होण्याची शक्यता आहे. सर्व संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे.
भारत-पाकिस्तान महामुकाबला १४ सप्टेंबरला!
भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यजमान UAE विरुद्ध खेळणार आहे. पण सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या १४ सप्टेंबरच्या दिवसावर, जेव्हा दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. या 'हाय-व्होल्टेज' सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की यावर्षी आशियाचा नवा 'चॅम्पियन' कोण बनतो.
0 टिप्पण्या