काय विचार करताय? हे खरं आहे का? हो, हे अगदी खरं आहे. जगावर राज्य करणाऱ्या Google च्या सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली उत्पादनांपैकी एक, म्हणजेच Google Chrome ब्राउझर, विकत घेण्यासाठी एका नव्या AI कंपनीने थेट 34.5 अब्ज डॉलर्सची, म्हणजेच जवळपास 2 लाख 88 हजार कोटी रुपयांची रोख ऑफर दिली आहे. या एका बातमीने सिलिकॉन व्हॅलीपासून दिल्लीपर्यंत सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ही कंपनी आहे तरी कोण? आणि एकाएकी एवढी मोठी ऑफर देण्यामागे तिचा हेतू काय? चला, या बातमीची संपूर्ण चिरफाड करूया.
‘Perplexity AI’ नावाचं नवं वादळ!
ज्या कंपनीने ही धाडसी ऑफर दिली आहे, तिचं नाव आहे Perplexity AI. ही एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर काम करणारी सर्च स्टार्टअप कंपनी आहे, ज्याचे नेतृत्व भारतीय वंशाचे सीईओ अरविंद श्रीनिवास करत आहेत. गंमत म्हणजे, Perplexity AI चं स्वतःचं बाजारमूल्य जेमतेम 14-18 अब्ज डॉलर्स आहे, पण त्यांनी ऑफर दिली आहे तब्बल 34.5 अब्ज डॉलर्सची! ही रक्कम क्रोमच्या अंदाजित मूल्यापेक्षा (15-17 अब्ज डॉलर्स) जवळपास दुप्पट आहे.
पण...ही ऑफर दिलीच का? यामागे आहे अमेरिकेचा दबाव?
हा सगळा प्रकार अचानक घडलेला नाही. यामागे आहे अमेरिकेच्या न्याय विभागाचा (DOJ) Google वरील अँटीट्रस्ट खटला. सोप्या भाषेत सांगायचं तर, गुगलने सर्च इंजिन मार्केटमध्ये आपली मक्तेदारी (monopoly) निर्माण केली आहे, असा सरकारचा आरोप आहे. या खटल्याचा निकाल Google च्या विरोधात लागल्यास, कंपनीला जबरदस्तीने आपला क्रोम ब्राउझर विकावा लागू शकतो.
Perplexity AI ने हीच संधी साधली आहे. त्यांनी सरकारसमोर एकप्रकारे स्वतःला पर्याय म्हणून सादर केलं आहे. "तुम्ही Google ला क्रोम विकायला लावणार असाल, तर आम्ही ते विकत घ्यायला तयार आहोत," असाच काहीसा संदेश या ऑफरमधून जातोय. यामुळे स्पर्धेला चालना मिळेल आणि युजर्सना जास्त पर्याय मिळतील, असा Perplexity चा दावा आहे.
एवढा पैसा येणार कुठून?
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, ज्या कंपनीची स्वतःची किंमत कमी आहे, ती एवढी मोठी कॅश ऑफर कशी देऊ शकते? Perplexity ने स्पष्ट केलंय की, त्यांनी या डीलसाठी अनेक मोठ्या इन्व्हेस्टमेंट फंड्सकडून निधी उभारण्याची तयारी पूर्ण केली आहे. म्हणजेच, पैशाची चिंता नाही!
या ऑफरमध्ये Perplexity ने दिल्या आहेत 'या' अटी:
Perplexity ने गुगलला फक्त पैशांचं आमिष दाखवलेलं नाही, तर काही मोठ्या कमिटमेंट्सही केल्या आहेत, जसे की:
- Chromium (क्रोमचा मूळ कोड) हा नेहमीप्रमाणे ओपन-सोर्स ठेवला जाईल.
- पुढील २ वर्षांत क्रोममध्ये ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल.
- क्रोममधील डीफॉल्ट सर्च इंजिन म्हणून Google ला तूर्तास हटवले जाणार नाही.
तर मग पुढे काय? Google खरंच Chrome विकणार का?
विश्लेषकांच्या मते, अजिबात नाही! Google Chrome हे कंपनीसाठी फक्त एक ब्राउझर नाही, तर अब्जावधी युजर्सपर्यंत पोहोचण्याचं आणि डेटा मिळवण्याचं एक शक्तिशाली माध्यम आहे. गुगल सहजासहजी आपलं हे 'सोन्याचं अंडं देणारं कोंबडं' विकणार नाही आणि वेळ पडल्यास कोर्टात याविरोधात मोठी लढाई लढेल.
पण एक गोष्ट नक्की, Perplexity AI च्या या धाडसी खेळीने टेक जगात एक नवीन वादळ निर्माण केलं आहे. OpenAI आणि Yahoo सारख्या कंपन्याही क्रोम विकत घेण्याच्या शर्यतीत उतरू शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे येणारा काळ हा Google साठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे, हे मात्र नक्की!
0 टिप्पण्या