स्टार प्रवाह वाहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीकोरी आणि तितकीच उत्कंठावर्धक मालिका घेऊन येत आहे. 'नशीबवान' असं या नव्या मालिकेचं नाव असून, नावाप्रमाणेच ही मालिका नशिबाचे फासे कसे उलटे पडू शकतात, याचा एक जबरदस्त ड्रामा आपल्यासमोर सादर करणार आहे. मालिकेचा प्रोमो अधिकृतपणे रिलीज होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातील दमदार संवाद आणि थरारक दृश्यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रोमोत काय आहे खास? दमदार खलनायक आणि असहाय्य नायिका!
व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये ज्येष्ठ अभिनेते अजय पुरकर एका नव्या आणि दमदार भूमिकेत दिसत आहेत. नागेश्वर घोरपडे नावाच्या गडगंज श्रीमंत व्यक्तीचा 'लुक' त्यांनी साकारला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करताना दिसणारा हा नागेश्वर वरकरणी कितीही धार्मिक वाटत असला, तरी त्याच्यामागे एक क्रूर भूतकाळ दडलेला आहे. पूजेच्या वेळीच गुरुजी त्याच्या कानात सांगतात, "पत्रिकेप्रमाणे तुमच्या नशिबाचे फासे आता उलटे पडायला सुरुवात झाली आहे. हे सगळं ज्याचं आहे, त्याच्याकडे आता जाणार आहे. तुम्ही लवकरच रस्त्यावर येणार आहात!" हा संवाद ऐकून नागेश्वरच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव बरंच काही सांगून जातात.
'तू माझी मुलगी नाहीस, रस्त्यावर सापडलीस तू!'
एकीकडे नागेश्वर घोरपडेची ही श्रीमंती आणि दुसरीकडे आहे मालिकेची नायिका गिरिजा. एका नव्या चेहऱ्याला या मालिकेतून मोठी संधी देण्यात आली आहे. प्रोमोमध्ये गिरिजा तिच्या दारुड्या वडिलांना घरी घेऊन जाताना दिसते. त्यावेळी तिचे वडील तिच्या मनावर एक मोठा आघात करतात. ते म्हणतात, "तू जा इथून, मी तुझा बाप नाहीये. रस्त्यावरन उचलून आणलंय मी तुला." हे धक्कादायक सत्य ऐकून गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती विचारते, "मग माझे खरे आई-बाबा कोण आहेत आणि कुठे आहेत?"
खलनायकाचं ते एक वाक्य... अंगावर काटा आणणारं!
गिरिजाच्या या प्रश्नाचं उत्तर नागेश्वर घोरपडेच्या भूतकाळात दडलेलं आहे. त्यानेच गिरिजाच्या खऱ्या आई-वडिलांची संपत्ती हडप करून त्यांचा जीव घेतलेला असतो आणि चिमुरड्या गिरिजाला रस्त्यावर सोडून दिलेलं असतं, जिला एका दारुड्या व्यक्तीने वाढवलेलं आहे. जेव्हा गुरुजी त्याला गिरिजाबद्दल सावध करतात, तेव्हा नागेश्वर थंडपणे म्हणतो, "जिथे आईबापाला मी गाडलं, तिथे पोरीची काय भिशाद आहे!" त्याचं हे एकच वाक्य मालिकेच्या कथेचा संपूर्ण सार सांगून जातं आणि अंगावर अक्षरशः काटा आणतं.
एक शापित गाणं, जे ऐकून १०० लोकांनी संपवलं जीवन! सरकारलाही घालावी लागली बंदी...
काय असेल नशीबवान मालिकेची कथा ?
आता गिरिजाला तिच्या खऱ्या आई-वडिलांबद्दलचं सत्य कळेल का? ज्याने तिच्या आई-वडिलांना संपवलं, त्याच नराधम नागेश्वर घोरपडेशी तिचा सामना कसा होईल? तिची हक्काची संपत्ती ती परत मिळवू शकेल का? नागेश्वर आणि गिरिजा यांचं नातं नेमकं काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 'नशीबवान' या मालिकेतून मिळणार आहेत. या मालिकेचा जबरदस्त प्रोमो पाहता, स्टार प्रवाहवर पुन्हा एकदा एक हाय-व्होल्टेज ड्रामा मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे, हे नक्की!
तुम्ही 'नशीबवान' ही नवी मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात? कमेंट करून नक्की सांगा!
0 टिप्पण्या