मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांपासून 'वर्कलोड मॅनेजमेंट' हा शब्द इतका परवलीचा झाला आहे की, महत्त्वाच्या सिरीजमधूनही मोठे खेळाडू आरामात बाहेर बसतात. पण आता या 'फॅशनेबल' शब्दावर भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी सणसणीत टोला लगावला आहे. निमित्त ठरलं आहे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची इंग्लंड दौऱ्यातील अविश्वसनीय कामगिरी! गावसकरांच्या मते, सिराजने एकट्याने या 'वर्कलोड' नावाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
सिराजचा 'नॉन-स्टॉप' शो आणि गावसकरांचे सडेतोड बोल!
इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत मोहम्मद सिराजने एकही मॅच न थांबता केवळ सहभागच नाही, तर तब्बल २३ विकेट्स घेऊन सर्वांना चकित केले. एका फास्ट बॉलरसाठी सलग पाच कसोटी खेळणं हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रचंड आव्हानात्मक असतं. पण सिराजने हे आव्हान लिलया पेललं.
याच कामगिरीवर बोलताना गावसकर म्हणाले, "मला वाटतं सिराजने 'वर्कलोड' नावाच्या गोष्टीला भारतीय क्रिकेटमधून कायमचं संपवून टाकलं आहे. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता, तेव्हा दुखणं आणि थकवा विसरून जायला हवा. हा सगळा मनाचा खेळ आहे, शरीराचा नाही."
सीमेवरील जवानांचं उदाहरण, नक्की निशाणा कोणावर?
आपला मुद्दा अधिक धारदारपणे मांडताना गावसकर यांनी सीमेवरील जवानांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "तुम्हाला खरंच वाटतं का की सीमेवर आपले जवान 'वर्कलोड'बद्दल विचार करत असतील?" त्यांचा हा सवाल थेट बीसीसीआय आणि निवड समितीसोबतच त्या खेळाडूंनाही आहे, जे वारंवार विश्रांतीची मागणी करतात. देशासाठी खेळणं हा सर्वात मोठा सन्मान आहे आणि त्यासाठी कोणतीही सबब चालत नाही, असं गावसकर यांनी ठणकावून सांगितलं.
'वर्कलोड' शब्दाला आता कायमचा रामराम?
सुनील गावसकर यांनी आशा व्यक्त केली आहे की, सिराजच्या या उदाहरणावरून प्रेरणा घेऊन आता 'वर्कलोड मॅनेजमेंट' हा शब्द टीम निवडीच्या आड येणार नाही. खेळाडूंची शारीरिक क्षमता महत्त्वाची आहेच, पण देशासाठी खेळण्याची जिद्द आणि मानसिक कणखरता त्याहूनही मोठी आहे, हेच गावसकरांना अधोरेखित करायचे आहे.
सिराजने दाखवून दिले आहे की, इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आता यानंतर भारतीय क्रिकेटमधून हा परदेशी शब्द आणि विचार कायमचा हद्दपार होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
0 टिप्पण्या