तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील बबिताजी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या एका कठीण काळातून जात आहे. त्यांच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैयक्तिक आयुष्यातील या तणावामुळे व्यावसायिक जीवनावरही परिणाम होत असल्याचे मुनमुनने म्हटले आहे. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सांभाळताना दमछाक होत असल्याचे तिने म्हटले आहे.
सोशल मीडियावरून दिली माहिती
मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. तिने लिहिले की, "मी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सक्रिय नाही. हो, कारण माझी आई आजारी आहे आणि गेल्या १० दिवसांपासून मी रुग्णालयाच्या चकरा मारत आहे. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच ती बरी होईल." मुनमुनच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या आईच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात तारेवरची कसरत
आईच्या आजारपणामुळे आणि व्यावसायिक कामांमुळे तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे मुनमुनने म्हटले आहे. ती पुढे म्हणाली, "व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन साधणं खूप थकवणारं आहे. पण मी माझ्या मित्रांची आभारी आहे, ज्यांनी मला खूप मोठा आधार दिला. देव महान आहे."
'तारक मेहता'मधील अनुपस्थिती आणि अफवा
गेल्या काही काळापासून मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या भागांमध्ये दिसत नसल्याने तिने मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या केवळ अफवा असल्याचे तिने आणि मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी स्पष्ट केले आहे. असित मोदी यांनी सांगितले की, मुनमुन तिच्या वैयक्तिक कारणांमुळे काही भागांच्या चित्रीकरणावेळी उपस्थित नव्हती, मात्र ती मालिकेचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मुनमुन दत्ता गेल्या १७ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा भाग आहे. बबिता अय्यर या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. जेठालालसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडते. सध्याच्या कठीण काळात तिच्या चाहत्यांकडून तिला मोठा भावनिक पाठिंबा मिळत आहे.
0 टिप्पण्या