विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी एका स्फोटक पत्रकार परिषदेत 'वोट चोरी'चा पर्दाफाश करत देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी केवळ आरोप न करता, सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोग (ECI) यांच्या संगनमताने निवडणुकीत पद्धतशीर घोटाळा होत असल्याचा दावा पुराव्यांसह केला आहे, ज्यामुळे लोकशाहीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल गांधींनी बंगळूर सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा क्षेत्राला या 'महाघोटाळ्याचे' केंद्र म्हटले. त्यांनी सादर केलेल्या तपशीलानुसार, येथे तब्बल १ लाखांहून अधिक बोगस मतदार आहेत, ज्यात बनावट पत्ते, दुबार नावे आणि एकाच पत्त्यावर शेकडो मतदार अशा गंभीर बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपला मिळालेल्या प्रचंड आघाडीमुळे काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या ३२,७०७ मतांनी पराभव झाला होता. "ही १ लाख मते वगळल्यास निकाल वेगळा असता," असा दावा राहुल यांनी केला.
#VoteChori हमारे लोकतंत्र पर Atom Bomb है। pic.twitter.com/jcLvhLPqM6
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2025
या घोटाळ्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला जबाबदार धरले. "आम्ही जेव्हा मतदार यादीची इलेक्ट्रॉनिक कॉपी मागितली, तेव्हा आम्हाला जाडजूड कागदांचे गठ्ठे दिले गेले जे मशीन-रीडेबल नाहीत. जर डिजिटल डेटा मिळाला असता, तर हा घोटाळा आम्ही ३० सेकंदात शोधला असता, पण त्यासाठी आम्हाला सहा महिने लागले. आयोग जाणीवपूर्वक डेटा विश्लेषण रोखत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
हा प्रकार केवळ बंगळूपुरता मर्यादित नसून, हरियाणा आणि महाराष्ट्रातील अनपेक्षित निवडणूक निकालांशीही त्यांनी याला जोडले. "प्रत्येक पक्षाला अँटी-इन्कम्बन्सीचा फटका बसतो, पण भाजपला का नाही? एक्झिट पोल चुकीचे कसे ठरतात?" असे सवाल विचारत त्यांनी मोठ्या कटाकडे संकेत दिले आहेत.
राहुल गांधींच्या या गौप्यस्फोटाने देशात राजकीय वादळ निर्माण झाले असून, त्यांनी ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयातही लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आता निवडणूक आयोग आणि सरकार या पुराव्यांवर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या