मुंबई: बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शक फराह खान (Farah Khan) तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. पण ती कॅमेऱ्यामागे कशी वागते? खरंच ती तितकीच मनमोकळी आहे की तिचा स्वभाव वेगळा आहे? या प्रश्नाचं उत्तर चक्क तिच्याच पर्सनल कुकने (Personal Cook) दिलं आहे, तेही अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) यांच्यासमोर! फराहच्या लेटेस्ट व्लॉग शूटमधील हा मजेदार किस्सा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
तर झालं असं की, फराह खान तिच्या व्लॉगच्या शूटिंगसाठी जवळचे मित्र बोमन इराणी यांच्या घरी पोहोचली. तिथे फराहचा कुक दिलीपही होता. बोमनने संधी साधली आणि टीमला कॅमेरा बंद करण्यास सांगून दिलीपकडे फराहच्या काही 'अंदर की बातें' काढायला सुरुवात केली.
जेव्हा बोमनने साधला डाव...
बोमनने दिलीपला हळूच विचारलं, "दिलीप, कॅमेरा बंद आहे. आता खरं सांग, फराह मॅडम कॅमेऱ्यासमोर इतकी चांगली वागते, पण कॅमेरा बंद झाल्यावर कशी असते?" यावर दिलीप क्षणाचाही विचार न करता म्हणाला, "खूप खडूस आहे!"
एवढ्यावरच बोमन थांबला नाही. त्याने पुढे विचारलं, "ती माझ्याबद्दल तर कॅमेऱ्यावर खूप चांगलं बोलते, पण प्रत्यक्षात काय म्हणते?" यावर दिलीपचा हजरजबाबीपणा पाहा! तो लगेच म्हणाला, "नाही, तुमची खूप वाईटसाईट बोलते." हे ऐकून तिथे एकच हशा पिकला.
फराहच्या डाएटिंगचं सत्य आलं समोर!
बोमनने पुढे मोर्चा फराहच्या डाएटकडे वळवला. त्याने विचारलं, "फराह डाएटिंग करत आहे का? काय खाते डाएटमध्ये?" यावर दिलीपचा खुलासा तर आणखीनच मजेशीर होता. तो म्हणाला, "मॅडम अजिबात डाएटवर नाहीत. डाएटवर असताना फक्त डाळ-भात, सूप-भात खातात. पण जेव्हा कामावर नसतात, तेव्हा खूप सारं खातात."
मग तू इतका बारीक कसा, यावर दिलीप म्हणाला की, "फराह मॅडम खूप काम करून घेतात!" अर्थात, हे सगळं संभाषण एका हलक्या-फुलक्या आणि विनोदी वातावरणात सुरू होतं.
हा किस्सा जरी विनोदी असला तरी, तो फराह आणि तिच्या टीममधील सुंदर नात्याचं दर्शन घडवतो. दिलीप हा मूळचा बिहारचा असून तो फराहचा पर्सनल कुक आहे. फराह नुकतीच तिच्या कुकिंग आणि ट्रॅव्हल व्लॉगसाठी मालदीवला गेली होती, तेव्हा दिलीपही तिच्यासोबत होता.
विशेष म्हणजे, फराह केवळ दिलीपला रोजगारच देत नाही, तर त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही उचलते. ही गोष्ट फराहचं मोठं मन आणि तिच्यातील माणुसकी दाखवते.
प्रेक्षकांना का आवडतो हा अंदाज?
फराहच्या व्लॉगला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियतेमागे हेच कारण आहे. तिचा व्लॉग म्हणजे फक्त ग्लॅमर नाही, तर त्यामागे असलेली तिची टीम, त्यांच्यासोबतची तिची मैत्री, ही छोटी-छोटी पण मन जिंकणारी मस्ती आणि जिव्हाळा प्रेक्षकांना खूप आवडतो. बोमन आणि दिलीप यांच्यातील या संवादाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे आणि फराहच्या व्लॉगला आणखी लोकप्रिय बनवले आहे.
0 टिप्पण्या