मुख्य मुद्दे:
- जयपूर रेप केसमध्ये यश दयालला हायकोर्टाचा दणका, अटकेपासून दिलासा नाही.
- पीडिता अल्पवयीन असल्याने कोर्टाची कठोर भूमिका, २२ ऑगस्टला पुढील सुनावणी.
- गाझियाबादमध्येही आहे रेपचा आरोप, तिथे मात्र मिळाली होती अटकपूर्व सूट.
- एकापाठोपाठ एक आरोपांमुळे IPL चॅम्पियनचं करिअर धोक्यात?
मुंबई: आयपीएल 2025 ची ट्रॉफी जिंकून यशाच्या शिखरावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयालच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक वादळं घोंगावत आहेत. क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या फलंदाजांची दांडी गुल करणारा हा स्टार खेळाडू आता कायद्याच्या खेळपट्टीवर मात्र बॅकफूटवर ढकलला गेला आहे. जयपूरमधील एका अल्पवयीन मुलीने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजस्थान हायकोर्टाने त्याला मोठा झटका दिला असून, त्याची अटक रोखण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे यश दयालवर आता अटकेची टांगती तलवार आहे.
जयपूर प्रकरण: नेमकं काय आहे प्रकरण?
ही कहाणी सुरू झाली २३ जुलै २०२५ रोजी, जेव्हा जयपूरच्या सांगानेर पोलीस स्टेशनमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने यश दयालविरोधात FIR दाखल केला. पीडितेनुसार, ती स्वतः एक उदयोन्मुख क्रिकेटर आहे आणि तिची ओळख यशसोबत २०२३ मध्ये झाली, तेव्हा ती फक्त १७ वर्षांची, म्हणजेच अल्पवयीन होती
यशने तिला क्रिकेटमध्ये मोठं करिअर घडवण्याचं स्वप्न दाखवलं. याच स्वप्नाच्या आड त्याने भावनिक आणि शारीरिक शोषण केल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. आरोपानुसार, २०२३ मध्ये यशने तिला जयपूरच्या एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला आणि त्यानंतर हे सत्र तब्बल दोन वर्षे सुरूच राहिले.
कोर्टात काय झालं? वकिलांचा युक्तिवाद का फसला?
बुधवारी जेव्हा हे प्रकरण राजस्थान हायकोर्टात सुनावणीसाठी आले, तेव्हा वातावरण तापले होते. यश दयालच्या वकिलांनी गाझियाबादमधील केसचा दाखला दिला. "आमच्यावर गाझियाबादमध्येही असाच एक रेप केस दाखल झाला होता, ज्यावर अलाहाबाद हायकोर्टाने अटकेला स्थगिती दिली आहे," असा युक्तिवाद त्यांनी केला.
पण, जयपूर हायकोर्टाने हा युक्तिवाद स्पष्टपणे धुडकावून लावला. कोर्टाने कठोर शब्दात सांगितले, "हे प्रकरण वेगळे आहे. इथे पीडिता घटनेच्या वेळी अल्पवयीन (नाबालिग) होती. त्यामुळे पॉक्सो (POCSO) कायद्याचे गांभीर्य लक्षात घेता, अटकेवर किंवा पोलीस कारवाईवर कोणतीही स्थगिती दिली जाऊ शकत नाही." कोर्टाने या प्रकरणात 'केस डायरी' मागवली असून, पुढील सुनावणी २२ ऑगस्ट २०२५ रोजी ठेवली आहे.
आशिया कप 2025: रोहितच्या रिटायरमेंट मुळे या स्टार खेळाडूला मिळाली भारतीय टीम ची Captaincy?
गाझियाबादमध्येही जुनं प्रकरण
यश दयालवरील हा काही पहिला आरोप नाही. याआधी जुलै २०२५ मध्येच, गाझियाबादमधील एका तरुणीने त्याच्यावर लग्नाचं खोटं आमिष दाखवून पाच वर्षे शोषण केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणात मात्र अलाहाबाद हायकोर्टाने यशला दिलासा दिला होता. "एखादी व्यक्ती पाच वर्षे कुणाला मूर्ख बनवू शकत नाही," अशी टिप्पणी करत कोर्टाने १५ जुलै रोजी त्याच्या अटकेला स्थगिती दिली होती. त्या प्रकरणात यशने उलट तरुणीवरच ब्लॅकमेलिंग आणि पैसे उकळल्याचे आरोप केले होते.
गाझियाबाद प्रकरणात दिलासा मिळाला असला तरी, जयपूरमधील प्रकरण यशसाठी मोठी डोकेदुखी ठरले आहे. कारण इथे पीडिता अल्पवयीन असल्याने आणि पॉक्सो कायद्यामुळे (POCSO Act) यशच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एका यशस्वी IPL सीजननंतर जिथे त्याच्या करिअरला नवी दिशा मिळायला हवी होती, तिथे आता तो गंभीर कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.
आता २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत RCB, BCCI किंवा स्वतः यश दयाल यावर काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण एक गोष्ट नक्की, की क्रिकेटच्या या चमकत्या ताऱ्याभोवती संकटाचे ढग दाटून आले आहेत.
0 टिप्पण्या