आशिया चषक 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेचे वारे वाहू लागले अन, भारतीय संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. या घोषणेपूर्वीच, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांनी आपली संभाव्य १५ सदस्यीय संघ आणि प्लेइंग इलेव्हन (Playing XI) जाहीर करून क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील नायक ठरलेल्या आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल (Shubman Gill) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना कैफने आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिलेले नाही.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी कैफने निवडलेल्या संघात अनेक आश्चर्यकारक नावांचा समावेश आहे. त्याने कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) विश्वास दाखवला आहे, तर उपकर्णधार म्हणून अष्टपैलू अक्षर पटेलची (Axar Patel) निवड केली आहे.
गिल-सिराज बाहेर, नव्या चेहऱ्यांना संधी
मोहम्मद कैफने आपल्या १५ सदस्यीय संघात शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोघांनाही निवडले आहे. मात्र, प्रत्यक्ष मैदानात उतरणाऱ्या ११ खेळाडूंच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. इंग्लंडमधील दमदार कामगिरीनंतरही या दोघांना बाहेर बसवण्याचा निर्णय अनेकांसाठी अनपेक्षित आहे.
कैफने सलामीच्या जोडीत मोठा बदल करत संजू सॅमसन (Sanju Samson) आणि युवा अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) यांना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा (Tilak Varma) फलंदाजीसाठी येईल, तर चौथ्या क्रमांकाची जबाबदारी कर्णधार सूर्यकुमार यादव सांभाळेल.
अष्टपैलूंवर मोठा भर
कैफच्या संघात अष्टपैलू खेळाडूंना अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येते. उपकर्णधार अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यानंतर, हार्दिक पंड्या (Hardik Pandya), शिवम दुबे (Shivam Dube) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हे तीन अष्टपैलू खेळाडू संघाला मजबूती देतील. या निवडीमुळे भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अधिक पर्याय उपलब्ध होतील.
संघातील मुख्य फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) निवड झाली आहे, तर वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांच्या खांद्यावर असेल.
मोहम्मद कैफची आशिया चषकासाठी संभाव्य प्लेइंग-11: (Mohmmad Kaif Asia Cup 2025 Playing 11)
- संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
- अभिषेक शर्मा
- तिलक वर्मा
- सूर्यकुमार यादव (कर्णधार)
- अक्षर पटेल (उपकर्णधार)
- हार्दिक पंड्या
- शिवम दुबे
- वॉशिंग्टन सुंदर
- कुलदीप यादव
- अर्शदीप सिंग
- जसप्रीत बुमराह
राखीव खेळाडू:
कैफच्या १५ सदस्यीय संघाला पूर्ण करण्यासाठी उर्वरित चार खेळाडूंमध्ये वरुण चक्रवर्ती, शुभमन गिल, मोहम्मद सिराज आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे.
आशिया चषकातील भारताचे वेळापत्रक (Team India's Asia Cup Schedule)
भारतीय संघ आपल्या आशिया चषक अभियानाची सुरुवात १० सप्टेंबर रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्याने करेल. त्यानंतर, १४ सप्टेंबर रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमानशी होईल. या स्पर्धेतील सर्व सामने T20 स्वरूपात खेळवले जाणार आहेत, जे पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाचे ठरतील.
0 टिप्पण्या