CSK News Marathi: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा हंगाम चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांसाठी एखाद्या दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. हंगामाच्या सुरुवातीलाच कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळली. पण 'थाला' धोनीची जादू यावेळेस चालली नाही आणि संघ प्लेऑफपर्यंत पोहोचू शकला नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर धोनीने संघात मोठ्या बदलांचे संकेत दिले होते. आता IPL 2026 च्या लिलावापूर्वी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे चेन्नईच्या गोटात खळबळ माजली आहे.
९ वर्षांनी घरवापसी, पण आता 'चेन्नईचा सुपुत्र' म्हणणार राम-राम?
एकेकाळी चेन्नईच्या गोलंदाजीचा कणा असलेला आणि संघाचा 'सुपुत्र' मानला जाणारा दिग्गज ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा चेन्नई सुपर किंग्सपासून वेगळे होण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, अश्विनने आपला निर्णय फ्रँचायझीला कळवला आहे. विशेष म्हणजे, तब्बल ९ वर्षांनंतर २०२५ मध्ये अश्विनची त्याच्या होम टीममध्ये घरवापसी झाली होती. त्यामुळे वर्षभरातच त्याने संघ सोडण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
२००९ मध्ये CSK मधूनच आपल्या आयपीएल कारकिर्दीची शानदार सुरुवात करणाऱ्या अश्विनचा संघाशी एक भावनिक आणि जुना संबंध आहे. त्याने सलग ८ हंगाम चेन्नईसाठी गाजवले. पण आता तो पुन्हा एकदा संघाचा निरोप घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसत आहे.
अकॅडमीचं संचालकपदही सोडणार? नेमकं कारण काय?
ही केवळ खेळाडू म्हणून संघ सोडण्याची गोष्ट नाही. गेल्या वर्षीच अश्विनवर चेन्नई सुपर किंग्सच्या अकॅडमीच्या 'संचालक' पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, अश्विन हे पदही सोडू शकतो. असं म्हटलं जातंय की, भविष्यात त्याच्या आणि फ्रँचायझीच्या संबंधांमध्ये कोणताही दुरावा किंवा 'मनमुटाव' निर्माण होऊ नये, यासाठी अश्विन हा निर्णय घेत आहे. पण इतका मोठा निर्णय घेण्यामागे नक्की कोणतं कारण आहे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
कॅप्टन ध्रुव जुरेल ट्विटर वर पोस्ट करत राजस्थान रॉयलने केली नव्या कॅप्टनची घोषणा, पण खरी कहाणी वेगळीच! इथे वाचा
IPL 2025 ठरलं निराशाजनक, आकड्यांचा खेळ काय सांगतो?
चेन्नईने मोठ्या अपेक्षेने दुबईतील मेगा ऑक्शनमध्ये अश्विनवर ९.७५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात परत आणले होते. पण आयपीएलचा १८ वा हंगाम (IPL 2025) अश्विनसाठी आणि संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरला.
अश्विनने खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये त्याला केवळ ७ विकेट्स मिळवता आल्या. यादरम्यान त्याची गोलंदाजी महागडी ठरली. फलंदाजीतही तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि ९ सामन्यांत केवळ ३३ धावा करू शकला. त्याच्या या खराब फॉर्ममुळेच तो संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून आत-बाहेर होत होता.
आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी संघात मोठे बदल अपेक्षित आहेत. धोनीने आधीच बदलांचे संकेत दिले होते. त्यामुळे अश्विनचा हा निर्णय त्याच बदलांचा एक भाग आहे की यामागे आणखी काही कारण आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पण एक गोष्ट नक्की, जर अश्विनने खरोखरच CSK ची साथ सोडली, तर हा 'येलो आर्मी'साठी मोठा धक्का असेल.
0 टिप्पण्या