मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबई आंदोलनाची फायनल रणनितीच जाहीर केली आहे. "आता चर्चेचे दरवाजे बंद झाले आहेत, आम्ही 58 लाख पुरावे दिलेत, आता फक्त कायदा हवा," अशा शब्दात त्यांनी सरकारला ठणकावले आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट षडयंत्राचा आरोप करत, आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितली आंदोलनाची पुढची दिशा...
"आता दीड वर्ष झालं, सरकारची वाट बघणार नाही!"
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर आम्ही मोर्चा काढला. सरकारने ती काढली, कायद्यात दुरुस्ती केली आणि आम्हाला सहा महिन्यांचा वेळ दिला. आता त्या गोष्टीला दीड वर्ष उलटून गेलंय. त्यामुळे आता त्यावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. आमची एकच मागणी आहे - मराठा आणि कुणबी आरक्षणाचा (Kunbi Reservation) कायदा तात्काळ पारित करा."
"58 लाख पुरावे दिले, आता आधार काय पाहिजे?"
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जरांगे म्हणाले, "आधी सरकारला कायदा पारित करायला आधार लागत होता. आम्ही शांत बसलो नाही, आम्ही काम केलं आणि तब्बल 58 लाख कुणबी नोंदींचा अहवाल आम्ही सरकारच्याच हातात दिला आहे. विशेष म्हणजे, ही समिती सरकारनेच गठीत केली होती. आता तुमच्याच समितीचा अहवाल तुमच्याकडे आहे, मग कायदा करायला अडचण काय आहे? आता आणखी कशाची वाट बघताय?"
"आमची पोरं रस्त्यावर झोपतील, पण हटणार नाहीत!"
मुंबई मोर्चाच्या तयारीबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आमची पोरं घाबरणारी किंवा पळून जाणारी नाहीत, ती जागेवर ठाम उभी राहतील. त्यांची राहण्या-झोपण्याची चिंता कुणी करू नये. काही पोरांनी पाऊस आल्यास अंगावर घेण्यासाठी 'कॅडर' घेतलेत, काही जण ट्रॅक्टर, ट्रक आणि जीपमध्ये झोपणार आहेत, तर काहीजण सोबत आणलेल्या राहुट्या (तंबू) टाकून मुक्काम ठोकतील. तयारी पूर्ण झाली आहे."
ट्रम्प–पुतिन भेटीचा भारतावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर
"दगडफेक झाली तर ती फडणवीसांची माणसं असतील"
आंदोलनाच्या शांततेची हमी देताना जरांगे यांनी एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले, "आम्ही पूर्णपणे शांततेत मुंबईत येणार. आमच्यातला कुणीही दगडफेक किंवा जाळपोळ करणार नाही. जर असं काही झालं, तर ते आमच्यातील कोणी नसून देवेंद्र फडणवीसांनी षडयंत्र करून पाठवलेली माणसंच असतील, अशी आम्हाला दाट शंका आहे. आम्ही पोलिसांना दोष देणार नाही, कारण आमच्यासाठी पोलीस म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस. सर्वकाही त्यांच्याच इशाऱ्यावर चालतं."
"माय-माऊल्या गावांत थांबतील, पण एका लेकराला हात लावून दाखवा..."
यावेळी आंदोलनाची एक वेगळी रणनीती आखण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, "पावसाचे दिवस आणि मुंबईतील गैरसोय लक्षात घेता, आमच्या माय-माऊल्या (महिला) या मोर्चात सहभागी होणार नाहीत. त्या गावागावांत थांबून स्थानिक आंदोलन सांभाळतील. पण सरकारला माझा शेवटचा इशारा आहे, मुंबईत आमच्या एका जरी लेकरा-बाळाला पोलिसांनी हात लावला, तर इकडे गावांत राहिलेल्या माझ्या माय-माऊल्या आणि माणसं अख्खं राज्य पेटवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यानंतर प्रत्येक आमदार आणि मंत्र्याच्या घराला शांततेत घेराव घातला जाईल आणि त्यांचा विषय कायमचा संपवला जाईल. मग त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही."
0 टिप्पण्या