IPL २०२५ चा हंगाम चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि त्यांच्या करोडो चाहत्यांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. संघाच्या या खराब कामगिरीमागे एका खेळाडूचा नव्हे, तर बहुतांश खेळाडूंचा सुमार खेळ कारणीभूत ठरला. स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर धोनीने संघात महत्त्वपूर्ण बदल आणि सुधारणा आवश्यक असल्याचे संकेत दिले होते. आता आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी त्याच्या या वक्तव्याची सत्यता समोर येऊ लागली आहे.
ताज्या रिपोर्ट्सनुसार, चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापन तब्बल १० खेळाडूंना संघातून मुक्त करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसारख्या मोठ्या नावाचाही समावेश आहे.
आयपीएल २०२६ पूर्वी CSK मधून 'या' १० खेळाडूंना वगळले जाण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाची (IPL 2026) सुरुवात पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी यावर्षी डिसेंबर महिन्यात खेळाडूंचा भव्य लिलाव आयोजित केला जाईल. या लिलावापूर्वी सर्व संघांना आपल्या रिटेन (संघाल कायम ठेवलेल्या) केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला (BCCI) सादर करावी लागेल.
या पार्श्वभूमीवर, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. संघ व्यवस्थापन आगामी हंगामासाठी जवळपास १० खेळाडूंना रिलीज करू शकते. या यादीत अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन याचे नाव सर्वात पुढे आहे, ज्याला संघाने ९.७५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याच्याव्यतिरिक्त, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी आणि दीपक हुड्डा यांसारख्या खेळाडूंचाही मार्ग मोकळा केला जाऊ शकतो.
लिलावात CSK उतरणार मोठ्या रकमेसह
गेल्या हंगामातील खेळाडूंची निराशाजनक कामगिरी पाहता, चेन्नई सुपर किंग्ससाठी अनेक खेळाडूंना रिलीज करणे ही एक प्रकारची गरज बनली आहे. संघाच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर चेन्नईने या १० खेळाडूंना रिलीज केले, तर त्यांच्या पर्समध्ये (लिलावासाठी उपलब्ध रक्कम) तब्बल ३४.४५ कोटी रुपये जमा होतील. या मोठ्या रकमेसह CSK लिलावात उतरून आयपीएल २०२६ साठी एक नवीन आणि मजबूत संघ तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकते.
संभाव्य रिलीज होणाऱ्या खेळाडूंची यादी (रक्कमेनुसार):
- आर. अश्विन (₹९.७५ कोटी)
- डेव्हॉन कॉनवे (₹६.२५ कोटी)
- रचिन रवींद्र (₹४ कोटी)
- राहुल त्रिपाठी (₹३.४ कोटी)
- सॅम करन (₹२.४ कोटी)
- गुरजपनीत सिंग (₹२.२ कोटी)
- नाथन एलिस (₹२ कोटी)
- दीपक हुड्डा (₹१.७५ कोटी)
- जेमी ओव्हरटन (₹१.५ कोटी)
- विजय शंकर (₹१.२ कोटी)
'थाला' धोनी आयपीएल २०२६ खेळणार का?
प्रत्येक आयपीएल हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न असतो - 'महेंद्रसिंग धोनी पुढचा हंगाम खेळणार का?' आयपीएल २०२५ नंतर हा प्रश्न पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. यावर स्वतः धोनीने एका कार्यक्रमात महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
धोनी म्हणाला, "मी पुढचा हंगाम खेळेन की नाही, हे मला अजून माहीत नाही. माझ्याकडे डिसेंबरपर्यंत विचार करण्यासाठी वेळ आहे. पुढील काही महिन्यांत मी यावर विचार करेन आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेईन."
धोनीच्या या उत्तराने त्याच्या खेळण्याबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावापूर्वीच धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या भवितव्याचे चित्र स्पष्ट होईल.
0 टिप्पण्या