Jitrab Movie Review in Marathi: दुष्काळाने होरपळलेला महाराष्ट्र, घरात असलेली अठरा विश्वे दारिद्र्याची परिस्थिती आणि अशातच दारात बांधलेली एक 'भाकड' गाय... जी आता ना वासरू देऊ शकत, ना दूध. मग तिचं करायचं काय? हा एकच प्रश्न जेव्हा कुटुंबाला आतून पोखरू लागतो, तेव्हा सुरू होतो माणूस आणि मुक्या प्राण्यांच्या नात्याचा एक भावनिक प्रवास. नुकताच प्रदर्शित झालेला 'जित्राब' हा मराठी चित्रपट याच काळजाला हात घालणाऱ्या कथेवर आधारित आहे. पण हा चित्रपट खरंच तेवढा प्रभावी आहे का? जाणून घेऊया या खास रिव्ह्यूमध्ये.
Jitrab Movie Review in Marathi
चित्रपटाची गोष्ट काय आहे? (Jitrab Movie Story?)
'जित्राब' या शब्दाचा एक अर्थ 'पाळीव जनावर' असा होतो. चित्रपटाची कथा सातारा-सांगली भागातील एका दुष्काळग्रस्त गावावर आधारित वाटते. इथं एक छोटंसं कुटुंब आहे - आई, वडील आणि एक कॉलेजला जाणारा मुलगा (पार्थ भालेराव). घरात खाण्यापिण्याचे वांधे आहेत, पण मुलाला मात्र गुलाबी स्वप्नं पडत आहेत. त्याला मित्रांसारखी नवी कोरी टू-व्हीलर हवी आहे.
या हट्टापायी तो दारात बांधलेल्या 'राणी' नावाच्या गाईला विकायला काढतो. पण अडचण ही आहे की, राणी आता 'भाकड' झाली आहे, त्यामुळे तिला कोणी विकत घ्यायलाही तयार नाही. अशा परिस्थितीत त्या मुक्या जनावराचं पालनपोषण कसं करायचं आणि घरच्या आर्थिक संकटातून मार्ग कसा काढायचा? या प्रश्नांच्या गुंत्यात अडकलेल्या कुटुंबाची ही एक Heart-touching कहाणी आहे.
दमदार अभिनय आणि वास्तववादी मांडणी
या चित्रपटाचा सर्वात मोठा Plus Point म्हणजे कलाकारांचा अभिनय. भारत गणेशपुरे, सुहास पळशीकर, रोहित माने आणि शिवाली परब या सगळ्यांनीच आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. पण या सगळ्यांमध्ये जो खरा 'हिरा' आहे, ती म्हणजे 'राणी' नावाची गाय. तिचे हावभाव, तिची शांत नजर कॅमेऱ्याने इतक्या सुंदरपणे टिपली आहे की, काही क्षणांतच प्रेक्षक तिच्या प्रेमात पडतात. असं वाटतं की, ही गाय कुणाला नको असेल तर आपणच तिला घरी घेऊन यावं.
यासोबतच चित्रपटाचे सेट डिझाईन, कॉस्च्युम आणि मेकअप या विभागांचे विशेष कौतुक करायला हवं. दुष्काळग्रस्त भागातील लोकांचे फाटलेले कपडे, फाटकी चप्पल आणि चेहऱ्यावरचा थकवा, हे सगळं इतकं खरं वाटतं की आपण पडद्यावर चित्रपट नाही, तर खरंखुरं आयुष्य पाहतोय असं वाटतं.
'गोमूत्र आणि सोनं' - संवेदनशील विषयाला धाडसी स्पर्श!
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक संवाद होता, "मोठ मोठ्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय, गोमूत्रातून सोनं तयार करता येतं." हा संवाद ऐकून अनेकांना वाटलं असेल की चित्रपट कोणत्यातरी प्रोपगेंडाच्या आहारी जाईल. पण दिग्दर्शक तानाजी घाडगे आणि लेखक अरविंद जगताप यांनी अत्यंत कौशल्याने आणि Neutral Stance घेत हा विषय हाताळला आहे.
शहरात मंदिराबाहेर उभ्या असलेल्या गाईंना चारा घालून 'पुण्य' कमावणारी लोकं आणि दुसरीकडे '33 कोटी देव' या संकल्पनेचा चुकीचा अर्थ काढून हिंदू धर्माला डिवचणारे लोक, या दोन्ही बाजू चित्रपटात येतात. पण मेकर्सनी कोणतीही बाजू न घेता एक वास्तववादी आणि संतुलित मांडणी केली आहे, जे खरंच कौतुकास्पद आहे.
खालिद का शिवाजी: एका सिनेमाने महाराष्ट्रात पेटवला वाद, सरकारही मैदानात! नक्की काय आहे हे प्रकरण?
पण कुठेतरी गाडी घसरली...
चित्रपटाच्या चांगल्या बाजू असल्या तरी काही गोष्टी खटकतात.
- फ्लॅट कथानक: चित्रपटाची कथा खूप सरळ रेषेत जाते. त्यात फार मोठे Twist and Turns नाहीत. त्यामुळे पावणेदोन तासांचा चित्रपट असूनही काही ठिकाणी तो थोडा कंटाळवाणा वाटू शकतो.
- कॅरेक्टर डेव्हलपमेंटचा अभाव: मुख्य पात्रांच्या आयुष्याबद्दल अधिक माहिती खूप उशिरा दिली जाते. उदाहरणार्थ, नायकाच्या वडिलांकडे तीन एकर शेती आहे, हे खूप नंतर कळतं. ही गोष्ट सुरुवातीलाच सांगितली असती, तर त्या पात्रांशी प्रेक्षक अधिक Emotional Connect झाले असते.
- मालिका टाईप दिग्दर्शन: काही सीन्स, जसे की गावातील पंचायतीचा सीन, एखाद्या टीव्ही मालिकेसारखे वाटतात. मोठ्या पडद्यावर तो अनुभव थोडा कमी पडतो.
Final Verdict: चित्रपट बघावा की नाही?
'जित्राब' हा एक Low Budget मध्ये बनवलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. यात काही त्रुटी नक्कीच आहेत, पण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर तो भाष्य करतो. जर तुम्हाला मसाला चित्रपटांपेक्षा वास्तववादी आणि विचार करायला लावणारे सिनेमे आवडत असतील, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही, तर आपल्या डोळ्यात अंजन घालणारा एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो - "आपण रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या गाईंकडे दुर्लक्ष करून 'गोमाते'च्या रक्षणाच्या गप्पा कशा मारू शकतो?"
या प्रामाणिक प्रयत्नासाठी आणि कलाकारांच्या दमदार अभिनयासाठी 'जित्राब'ला ५ पैकी ३ स्टार्स देता येतील. हा एक 'डीसेंट वन-टाइम वॉच' नक्कीच आहे.
0 टिप्पण्या