किंग इज बॅक!'... होय, क्रिकेटच्या मैदानावरचा राजा, विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या साम्राज्यात परतला आहे. T20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आता फक्त एकाच मिशनवर आहे - वनडे क्रिकेटमध्ये भारताला पुन्हा एकदा विश्वविजेता बनवणे. आणि या मिशनची तयारी त्याने सुरू केली आहे.
शुक्रवारी विराटने स्वतः सोशल मीडियावर सरावाचा एक फोटो शेअर केला, जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. आपल्या लाडक्या 'किंग कोहली'ला पुन्हा बॅट हातात घेतलेले पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण विराट कोणासोबत आणि कुठे ही तयारी करत आहे? चला जाणून घेऊया.
'Thank You Brother!' म्हणत विराट कोणासोबत करतोय प्रॅक्टिस?
विराटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर इनडोअर नेटमध्ये सराव करतानाचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तो गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक नईम अमीन यांच्यासोबत दिसत आहे. विराटने त्यांना धन्यवाद देत लिहिले, "हिटमध्ये मदत केल्याबद्दल धन्यवाद, भाऊ. तुम्हाला भेटून नेहमीच आनंद होतो." या फोटोमध्ये ग्रे टी-शर्ट आणि निळ्या ट्राउझरमध्ये असलेला विराट पूर्वीपेक्षाही जास्त फिट आणि तयार दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो.
IPL चॅम्पियन ते लंडन आणि आता थेट कमबॅक!
विराट कोहली शेवटचा आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसला होता. तो हंगाम त्याच्यासाठी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी ऐतिहासिक ठरला. रजत पाटीदारच्या नेतृत्वात RCB ने अंतिम फेरीत पंजाब किंग्जला नमवून 18 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या फायनलमध्ये विराटने 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.
मात्र, या विजयानंतर आरसीबीच्या व्हिक्ट्री परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत 11 जणांना प्राण गमवावे लागले होते. या दुःखद घटनेनंतर कोहली काही काळासाठी लंडनला आपल्या घरी गेला होता. तिथे युवराज सिंगने आयोजित केलेल्या एका चॅरिटी कार्यक्रमात आणि पत्नी अनुष्का शर्मासोबत विम्बल्डन 2025 चा आनंद घेतानाही तो दिसला होता. या ब्रेकनंतर आता तो पूर्णपणे फ्रेश होऊन मैदानात परतला आहे.
आता नजरा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर!
विराटच्या चाहत्यांना त्याला पुन्हा निळ्या जर्सीत पाहण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध होणारी मालिका पुढे ढकलल्याने त्याचे पुनरागमन लांबले होते, पण आता तो थेट ऑस्ट्रेलियात खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान वनडे मालिका होणार आहे. याच मालिकेत 'किंग कोहली' वनडे स्पेशालिस्ट म्हणून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करेल.
काही दिवसांपूर्वी पांढऱ्या दाढीतला विराटचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. त्याचा तो मॅच्युअर लूक आणि आताची ही जबरदस्त तयारी पाहून एकच प्रश्न पडतो - वनडेच्या नव्या अवतारात विराट कोहली ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर कसा प्रहार करेल? तुम्हाला काय वाटतं, 'किंग कोहली'ची ही दुसरी इनिंग पहिल्यापेक्षाही धमाकेदार ठरेल का?
0 टिप्पण्या